महाराष्ट्रात होणार बॉम्ब आणि दारूगोळ्यांची मेगा फॅक्टरी! जर्मन कंपनी आणि अनिल अंबानींमध्ये करार

रिलायन्स डिफेन्स: भारताच्या संरक्षण उत्पादन क्षमतेला जागतिक स्तरावर नवे स्वरूप देणारी एक ऐतिहासिक घडामोड नुकतीच समोर आली आहे. देशातील खासगी क्षेत्रातील आघाडीची कंपनी रिलायन्स डिफेन्स आणि जर्मनीतील प्रतिष्ठित शस्त्रास्त्र उत्पादक कंपनी राईनमेटल एजी यांच्यात एक महत्त्वाचा सामंजस्य करार झाला आहे. या करारानुसार, महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील वटड औद्योगिक क्षेत्रात एक उच्च दर्जाचा स्फोटक आणि दारूगोळा उत्पादन प्रकल्प उभारण्यात येणार आहे.

धीरूभाई अंबानी डिफेन्स सिटी

रिलायन्स डिफेन्सने प्रस्तावित केलेल्या या अत्याधुनिक प्रकल्पाला ‘धीरूभाई अंबानी डिफेन्स सिटी‘ असे नाव देण्यात आले आहे. रत्नागिरीच्या वटड औद्योगिक क्षेत्रात उभारण्यात येणाऱ्या या ग्रीनफिल्ड युनिटमध्ये वर्षाला अंदाजे दोन लाख तोफगोळ्यांचे उत्पादन होणार आहे. याशिवाय, १०,००० टन स्फोटके आणि २,००० टन उच्च क्षमतेचे प्रणोदक (प्रोपेलंट) तयार केले जाणार आहेत. हे उत्पादन केवळ देशाच्या संरक्षण गरजा भागवण्यासाठीच नव्हे, तर जागतिक बाजारपेठेत निर्यातीसाठी देखील केंद्रबिंदू ठरणार आहे.

राईनमेटल एजी

जर्मनीची राईनमेटल एजी ही जगातील एक अतिशय प्रतिष्ठित आणि अनुभवी शस्त्रास्त्र उत्पादक कंपनी असून ती १७१ देशांमध्ये कार्यरत आहे. कंपनीचे वार्षिक उत्पन्न २०२४ अखेरीस ९.८ अब्ज युरोपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. भारतासारख्या वेगाने प्रगती करत असलेल्या देशात त्यांची भागीदारी म्हणजे जागतिक स्तरावर भारताच्या संरक्षण उत्पादन क्षमतेला मान्यता मिळाल्याचा प्रत्यक्ष पुरावा आहे.

‘मेक इन इंडिया’चा मजबूत टप्पा

या सामंजस्य कराराच्या माध्यमातून ‘मेक इन इंडिया’ या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी अभियानाला मोठे बळ मिळणार आहे. या प्रकल्पामुळे भारताला केवळ संरक्षण क्षेत्रातील आयातीवरील अवलंबित्व कमी करता येणार नाही, तर दीर्घकालीन उद्दिष्टांमध्ये भारताला शस्त्रास्त्र निर्यातदार देशांमध्ये अग्रक्रमावर नेण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रिलायन्स डिफेन्सच्या या उपक्रमातून भारताच्या सामरिक क्षेत्रात आत्मनिर्भरतेचा नवा अध्याय सुरू होतो.

औद्योगिक विकासासाठी मोठी संधी

रत्नागिरीसारख्या तुलनेने औद्योगिकदृष्ट्या कमी विकास पावलेल्या जिल्ह्यात अशा भव्य प्रकल्पाची उभारणी होणे ही त्या भागातील तरुणांसाठी आणि स्थानिक उद्योजकांसाठी सुवर्णसंधी ठरणार आहे. या प्रकल्पामुळे हजारो थेट आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार असून, स्थानिक एमएसएमई (MSME) युनिट्सना देखील उपकरण पुरवठा आणि सहाय्यक सेवा पुरवण्याची मोठी संधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या औद्योगिक नकाशावर रत्नागिरीचे स्थान अधिक बळकट होणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *